Wednesday, May 18, 2016

सुक्या बोंबलाची पथ्याची मिरवणी

सुक्या बोंबलाची मिरवणी हा प्रकार सर्दीने नाकातून फुगे येऊ लागले , ताप झाला नि जेवणावरची इच्छा उडाली अशा वेळी करावा असा.
खडखडीत सुक्या बोंबलाचे दोन-तीन इंची तुकडे एक कपभर किंवा छोटा वाडगाभर घ्यावेत. शक्यतो बारीक बोंबील किंवा नेरल्या म्हणतात तेच बोंबील घ्यावेत. जे जरासे तळसले की आतवर नीट शिजतात असे. जरा वेळ भिजत टाकून मग त्यांच्या पोटांच्या सुकलेल्या पोकळीतून पेरिटोनियमच्या सुकलेल्या काळपट पडद्याचा अंश किंवा जे काही असेल ते नीटच काढायचं. मग एकदम स्वच्छ धुवून सगळं पाणी काढून टाकून फोडणीत पडायला जय्यत तय्यार ठेवावेत. मग एक मोठ्ठी अख्खी लसणाची कांडी सोलून जबरी ठेचून घ्यावी. चार चमचे मिरी ताजीताजी पूड करून घ्यावी.
उगीच फोडणीसाठी पातळसं अंथरूण म्हणून लहानसा अर्धा कांदा अगदी बारीक चिरायचा.
साफसूफ केलेली, धुतलेली कोथिंबीर उदारपणे बचकभर घ्यावी, त्यात चारपाच चांगल्या भरवशाच्या तिखट हिरव्या मिरच्या घालून ते सारं बारीक वाटावं. चारपाच कोकमं हाताशी ठेवावीत. मीठ, हळदही.
आता पातेलं तापत घालावं, आणि दोन लहान चमचे साजूक तूप फोडणीसाठी घालावं. आता तय्यार रहायचं फटापट सगळे जिन्नस तळसायला, घोळसायला.
तापल्या तुपावर हिंगाच्या काळजात चर्र होतंय तोवर सफा ठेचलेला लसूण टाकायचा. तो जरासा ओशाळला की वर कांदा टाकायचा. त्याचा तोंडाचा रंग पार उतरला पाहिजे. साला रडवतो काय आम्हाला... तो झाला की मग आपले साफसूफ केलेल बोंबील घालून आच कमी न करता घाईघाईने हलवत रहायचं. त्यावरच बारीक केलेली मिरीभुक्की, हळद मीठ आणि कोकमं घालून टाकायची. साऱ्या घराच्या कानाकोपऱ्यात बोंबीलमिरीलसणाचा खरपूस वास उधळेपर्यंत तळसत रहायचं. आणि मग आपल्यालाच आता सटासटा शिंका- ठसके येणार म्हटल्यावर कोथिंबीरमिरचीचं वाटण टाकून दोन पेले पाणी लोटून द्यायचं.
मग अख्खी तीन मिनिटं रटरट रटरट. मग मिरवणी तय्यार.
गरम  मऊ किंवा साध्या भाताबरोबर ओरपून खायची, किंवा तांदळाची भाकरी कुस्करून खायची. नाकात चोंदलेली सर्दी, घशात वाजणारा कफ सगळा सुट्टा होतो. खोबरं नाही, जास्त तेल नाही. 
आणि गंधसुगंध आहाहाहा... तेथे पाहिजेत खाणारे जातीचे सर्दीमान...

2 comments:

  1. व्वा !
    बाजारातून आणलेलं सुकट खूप खार असतं, भाजीच्या आधी ते धुवून घ्यायचं काय ?

    ReplyDelete
  2. व्वा !
    बाजारातून आणलेलं सुकट खूप खार असतं, भाजीच्या आधी ते धुवून घ्यायचं काय ?

    ReplyDelete