Wednesday, April 19, 2017

कैरी-सुकट... जन्मजन्मीची साथ आहे गा...


कैऱ्यांचा आंबटपणा आणि सुकी मासळी यांचे एक फारच आगळेवेगळे, सुंदर नाते आहे. जेव्हा या दोन चवी गळ्यात गळे घालून आपल्या गळ्याखाली उतरतात ना तेव्हा- आनंद पोटात माझ्या माईना रे माईना असं होतं.

मासळी सुकी असो वा ओली त्यात कैरी घालताना ती कर्रकर्रीत असली पाहिजे, हिरव्यागार पाठीतून पांढरंफेक पोट दिसणारीच पाहिजे. किंचित पिवळसर छटासुध्दा नाही चालणार.

आजवर जे जे पदार्थ या ब्लॉगवर लिहिले त्यात कैरीच्या दिवसांत एकच बदल करायचा. कोकमांऐवजी अशा मस्त करकरीत आंबटढाण कैरीच्या फोडी, छिललेला बाठा, कैरीचा कीस असं सगळं वापरायचं. कालवणात शिजून निघालेली कैरी, बाठाही कुस्करून खायला मजा येते.
कैरी घालायची तेव्हा नेहमीपेक्षा चिमटीभर तिखट वाढवायचे, किंवा हिरवी मिरचीही वाढवायची.
कारण कैरी  तिखटपणाला जरा आडवी घालते.

आंबाड सुकटीच्या किंवा सुक्या करंदीच्या किसमूरात, बांगड्याच्या किसमूरात कैरीचा जाडा कीस मिसळून पहा जरूर.
आणि सुकट कांदा करतानाही दोन चमचे कीसलेली कैरी टाका.
सोडेभात करताना सगळं शिजवून झाल्यावर शेवटची वाफ काढण्याआधी तीन चमचे कैरीचा कीस टाकून अलगद भात हलवून घ्यावा.
कालवणात टाकताना मात्र कीस नको- कडेच्या कापाच्या दोन फोडी आणि बाठा एक-दीड लिटर भरेल एवढ्या पातेलभर कालवणाला पुरतात.

चलो अभी एक कैरीसुकटभाकरीची रेसिपी नवीन देतेय.

बाळमुठीएवढी कैरी बारीक किसणीवर किसून घ्यायची.
पांढरीशुभ्र सुकट पाण्यात भिजवून ठेवून, स्वच्छ धुवून मग उपसून पिळून घ्यायची.
चारपाच मिरच्या, दहाबारा लसूण आणि वाडगाभर कोथिंबीर घसरून भरड वाटायचे. ते घालून सुकट किंचित  तेलावर हिंग टाकून फक्त एक मिनिट परतायची. मीठ घालून उतरवायचं. मग त्यात कैरीचा कीस मिसळायचा. चव जरा चाखून बघायची. थोडं खारट लागलं पाहिजे जिभेला. मग त्यात तांदळाचं पीठ घालायचं. सुकटकैरीचा ऐवज गरम असतानाच सगळं एकत्र मळून घ्यायचं.
हाहाहाः

आता जमेल तशी भाकरी नाहीतर कापडावर घालून थालिपीठासारखं थापून तव्यावर घालायची.
तेल सोडून थालिपीठासारखी तळा, नाहीतर भाकरीसारखी कोरडीच भाजा.
हातावर घेऊन खाण्यासारखी चीज. गरम खाल्ली तरी वाहवा. आणि थंड खाल्लीत तरी वावा.

अशाच प्रकारे ओल्या ताज्या कोलंबीला परतून मग तिचा खिमा करून त्याचेही थालिपीठ वा पराठा होईल. तांदळाच्या-ज्वारी पिठात करा थालिपीठ किंवा गव्हाच्या पिठात करा पराठा.
पण कैरी पाह्यजेच हांsss.




3 comments:

  1. च्यायला, तोंडात पाणी लागल्याचं कधी ऐकलं आहे का तुम्ही?

    ReplyDelete
  2. विहीरीला लागतं तसं?

    ReplyDelete
  3. अप्रतिम..... हा नविनच प्रकार कळला. नक्कीच करून बघणार. आत्ताच तोंडाला पाणी सुटलेय...

    ReplyDelete