Tuesday, February 2, 2016

कांद्याची हिरवी पात आणि सुकटीच्या शुभ्र कळ्या


सुका जवळा अनेक भाज्यांच्या चवीचा उद्धार करू शकतो. पण त्यातही कांद्याच्या पातीची भाजी जरा जास्त भाव खाऊन जाते. कांद्याच्या पातीची एक मध्यम जुडी घेऊन भाजी करायची असेल तर ती दोन माणसांना व्यवस्थित पुरते.
एक पातीची जुडी आधी सोडवून नीट स्वच्छ धुवून घ्यावी. मग त्यातले कांदे बारीक चिरून वेगळे ठेवावेत. कांदा आणि हिरवी पात यांना जोडणारा पांढरट हिरवा भाग साधारण दोन इंच लांबीचा असतो. तो काढून ठेवावा. सूपमध्ये, फोडणीच्या वरणामध्ये तो वापरता येतो. कांद्याची पात बारीक चिरून तिचा हिरवागार ढीग वेगळा घालावा. पातीतले कांदे अगदीच बारकुडे असले तर त्यांच्या जोडीला आणखी एखादा मध्यम कांदा चिरून घ्यावा.
चिरलेल्या पातीचा जेवढा ढीग असेल त्याच्या निम्मा ढीग होईल इतका सुक्या जवल्याचा ढीग घ्यावा. तो आधी सांगितल्याबरहुकूम घोळवून, स्वच्छ धुवून घ्यावा. गाळून घ्यावा आणि मग पिळून ठेवावा.
पाच हिरव्या मिरच्या आणि दहा लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. हिंग, कोकम, मीठ हाताशी ठेवावे.
आता कढईत- लोखंडी कढई घेतली तर फारच छान- एक डावभर तेल तापत घालावे. तापले की दोन चिमटी हिंग घालावा आणि तो फसफसताच ठेचलेली लसूण-मिरची तडतडू द्यावी. आता यात कांदा चांगला खरपूस परतून घ्यावा. गोडीळ रहाता कामा नये. मग त्यात पिळून ठेवलेला सुका जवला टाकावा. मीठ, कोकम टाकून जोरदार परतून घ्यावे. गॅसची आंच मोठ्यात मोठ्ठी हवी. या भाजीत हळद टाकायची नाही. टाकली तर चालत नाही असे नाही. पण मग हिरव्याचा रंग जरा बिनसतो. हे चांगले परतून तयार झाले की चिरलेल्या हिरव्या पातीचा ढिगारा कढईत ढकलून द्यायचा. आणि फार नाही अगदी दोनतीन मिनिटंच परतत रहायचा. फार पाणीही रहाता कामा नये आणि सुकून काळपटही होता कामा नये. अशा प्रकारे छानसा हिरवागार रंग आणि त्यातून मधून डोकावणाऱ्या पांढऱ्या सुकटीच्या जुईच्या कळ्या असं देखणं दिसू लागलं की गॅस बंद.

गरमगरम चपाती- नाहीतर तांदळाची मऊ, पातळ, शुभ्रपांढरी भाकरी यासोबत ही सुंदर आणि चविष्ट नॉनव्हेज भाजी असा बेत करा आणि माझी आठवण काढा.