Wednesday, August 22, 2018

बोंबलाची चटणी


भट म्हणाला भटणीला अर्धा बोंबील चटणीला असं उगीच म्हटलं जात असलं तरीही बोंबलाची चटणी करायची तर शेकडाभर बारीक बोंबील किंवा वीसपंचवीस जाडे बोंबील तरी हवेतच.
आधी सांगितल्याप्रमाणेच जाडे बोंबील उभे तोंडापासून शेपटीकडे असे विळीवर चिरून घ्यावेत आणि त्यांचे तीनतीन  इंचाचे तुकडे करावेत. बारीक बोंबील किंवा नेरल्या असल्या तर मग काही प्रश्नच नाही.
हे बोंबील पर, पोटाकडचं काहीबाही राहिलेलं काढून स्वच्छ करून घ्यायचं. आणि मग पळीभर तापलेल्या तेलात चिमटीभर हिंग टाकून आधी बचकाभर लसूण परतून मग त्यावर ते बोंबलांचे तुकडे चांगले खरपूस परतायचे.
आता पर्याय देते.
१- हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे तळून घ्यावेत
किंवा
२- लाल मिरच्यांचे मोठे तुकडे परतून घ्यावेत
किंवा
३- सरळ साधं लाल तिखट घ्यावं.
तिखट आपल्या तोंडाच्या क्षमतेप्रमाणे. आणि इतरत्रही किती झेपेल याचा विचार करूनच घ्यायचंय- मग ते हिरव्या मिरचीचं असो लाल मिरच्यांचं असो वा लाल तिखटाची भुक्की असो.
हे सगळं मिश्रण जरा गार होऊ द्यावं.
त्यात चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा आमचूर वा पाचसहा आंबोशीचे तुकडे घालावेत.
आता ते खलबत्त्यात कुटायचं तर कुटत बसा.
नाहीतर ग्राइंडरवर नीट लक्ष देऊन अगदी तीनचार सेकंद फिरवत फिरवत रहा. अंदाजाने. अगदी चूरचूर होता कामा नये. किंचित तुकडे रहायला हवेत.
पण आपल्याला अगदी बारीक भुस्सा चटणी आवडत असेल तर तसं करावं.

-
आता याचंच एक वेरिएशन.
बोंबलांचे तुकडे आणि लसूण भरपूर तेलावर परतूनपरतून घ्यावेत. ते गरम असतानाच त्यावर लाल तिखट आणि आमचूर पूड भुरभुरून मिसळावी.
हा झाला चखणा.
उंची मद्यासवेही छान.
आणि उगीच कधीही तोंडात टाकायलाही छान.


Thursday, May 4, 2017

खारं खारं...

खारं...
खारं हा सुक्या माशांतला सर्वात वासट प्रकार आहे. मोठे मांसल मासे मीठ लावून सुकवून वाळवलेले असतात. आणि त्याचे तुकडे कापून ते भाजले शिजवले जातात. यात सुरमई, पापलेट, हलवा, रावस, मुशी, दाडा, घोळ यातले कुठलेही मोठे मासे असू शकतात.
बरेच जण खारं आणून ते पुन्हा एखादं ऊन देऊन साठवतात. पण त्यापेक्षा अधिक स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची एक युक्ती केली जाते.
कटकटीची वाटली तरीही कसलातरी संसर्ग होण्यापेक्षा ते बरं असतं.
कुठलंही खारं आणलं की पाण्याखाली खसखसून धुवून घ्यावं. आणि एखाद्या कापडाने त्यातलं पाणी टिपून घेऊन माशाचे आपल्याला लागतील तसे तुकडे कापून घ्यावेत. त्या तुकड्यांना पुन्हा दोन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ असं चोळूनचोळून लावावं. आणि मग पुन्हा ते सारं कडक उन्हात वाळवावं. अशा खरी पध्दत आहे. पण वाळवायला जागा नाही वगैरे प्रश्नही असतात. अशा वेळी हे खारं तुकडे करून अर्ध मिनिट मायक्रोवेव्ह मधून काढून मग बरणीत, किंवा झिपबॅगमध्ये भरून सरळ फ्रीझमध्ये ठेवावं.

प्रत्येक माशाच्या खाऱ्याची चव थोडीथोडी वेगळी लागते. पण मुख्य लक्षण उग्र वास ते सर्वांच्या बाबतीत तसंच असतं.

खारं आवडीने खाणारे लोक ते तळून किंवा भाजून खातात. आणि त्याचा उग्र परिमळ आसमंतात तांडव करतो. आजुबाजूला कुणी कट्टर शाकाहारी असतील तर त्यांचे धाबे दणाणतील असा वास. घरात खारं भाजलं तर सगळ्या वाळणाऱ्या कपड्यांसकट अंगावरच्या कपड्यांनाही किंचित वास लागतो. पण एकाचं विष ते दुसऱ्याचं अमृत. खाऱ्याच्या दोन इंच भाजल्या-तळल्या तुकड्याशी तीन-चार भाकरी रिचवता येतात.

हळदीच्या पानात गुंडाळून भाजणे, लिंबाच्या पानांच्या पोटलीत गुंडाळून भाजणे अशा विविध धुरकट चवींची मजा घ्यायला खारं मस्तच.

भाजून झालं की त्यावर चमचाभर खोबरेल तेल सोडणे, तिळ तेल सोडणे किंवा ऑलिव तेल सोडणे असं काहीही.
लिंबाचा रस पिळा, कैरीचा कीस चोळा... खाऱ्याची लज्जत विविध प्रकारे वाढवली जाते.

माझ्या आत्याची खाऱ्याची कृती माझ्या लेकाला फार आवडायची. म्हणून एकदा शिकूनच घेतली. नाहीतर खरं म्हणजे खाऱ्याचं आणि माझं फारसं सख्य नाही.

कोणत्याही माशाचं खारं थोडक्याशा पाण्यात तांदळाचं पीठ कालवून त्यात भिजत घालायचं. पंधरा मिनिटांनंतर ते खारं त्या पिठाच्या काल्यात चोळूनचोळून घ्यायचं. यामुळे त्याचा वास बराच कमी होतो असं तिचं म्हणणं.
मग ते तुकडे चांगले धुवून निथळून ठेवायचे.
भाजल्या कांद्याखोबऱ्याचं एक छोटी वाटी वाटण घ्यायचं. पंधरावीस पाकळ्या लसूण ठेचायचा. कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची चांगली वाटीभर. चारपाच कोकमं किंवा करकरीत कैरीच्या तीन चार पातळ खापा हाताशी ठेवायच्या. अगदी छोटासा कांदा फारफार बारीक चिरून घ्यायचा. पातीचा कांदाही चालेलं.

मग शक्यतो लोखंडी तव्यात वा लोखंडी कढईत हवं ते तेल चार चमचे तापत घालायचं. हिंगपूड अर्धा चमचा फसफसली की लसणाचा खिमा टाकायचा. तो लालसर झाला किंवा आता जळतो असं वाटलं की मगच कांदा परतायला टाकायचा. तो खिनभर असल्यामुळे पुढच्या तीस सेकंदांत तोही करपू लागतो. मग टाकायचे वाटण. ते बराच वेळ परतून घेऊन अर्धे आटून गेले पाहिजे. मग त्यात एक चमचाभर हळद आणि लाल तिखट टाकायचे. धणेपूड, बडीशेपपूड अर्धाअर्धा चमचा भुरभुरवायची आणि त्यात खाऱ्याचे स्वच्छ केलेले तुकडे टाकायचे. आता हे बराच वेळ कमी आचेवर परतत ठेवायचे. आणि मग अगदी थोड्याशा- पाव वाटी पाण्याचा शिपका देऊन त्यात कोकम किंवा कैरी शिजू द्यायची. आणि हे सगळं नाकाला भावलं की मग जराशी चव घेऊन बघायची. कारण खाऱ्याच्या खारेपणाचा अंदाज लागू शकत नाही. म्हणून शिजल्यावर चाटून पाहायचे नि मगच मीठ घालायचे. शेवटी कोथिंबीर घालून ढवळून मग आगीवरून उतरवायचे. आणि ताबडतोब तव्यातून वा लोखंडी कढईतून दुसऱ्या भांड्यात काढायचे. कोकमं, कैरी शक्यतो काढून टाकायची. या चिजेचा रंग असा देखणा काळपट हिरवा दिसतो की बस्स. आणि मग पांढरी फेक तांदळाची भाकरी... क्या बात!

तरीही मला सगळ्यात आवडलेलं खारं होतं ते राखेत भाजलेलं...
आस्वलीला वनशीने अर्ध्या भाकरीवर घालून दिलेलं आणि मी हातावरच खाल्लेलं.
आठवणी वेड्याच असतात.













Wednesday, April 19, 2017

कैरी-सुकट... जन्मजन्मीची साथ आहे गा...


कैऱ्यांचा आंबटपणा आणि सुकी मासळी यांचे एक फारच आगळेवेगळे, सुंदर नाते आहे. जेव्हा या दोन चवी गळ्यात गळे घालून आपल्या गळ्याखाली उतरतात ना तेव्हा- आनंद पोटात माझ्या माईना रे माईना असं होतं.

मासळी सुकी असो वा ओली त्यात कैरी घालताना ती कर्रकर्रीत असली पाहिजे, हिरव्यागार पाठीतून पांढरंफेक पोट दिसणारीच पाहिजे. किंचित पिवळसर छटासुध्दा नाही चालणार.

आजवर जे जे पदार्थ या ब्लॉगवर लिहिले त्यात कैरीच्या दिवसांत एकच बदल करायचा. कोकमांऐवजी अशा मस्त करकरीत आंबटढाण कैरीच्या फोडी, छिललेला बाठा, कैरीचा कीस असं सगळं वापरायचं. कालवणात शिजून निघालेली कैरी, बाठाही कुस्करून खायला मजा येते.
कैरी घालायची तेव्हा नेहमीपेक्षा चिमटीभर तिखट वाढवायचे, किंवा हिरवी मिरचीही वाढवायची.
कारण कैरी  तिखटपणाला जरा आडवी घालते.

आंबाड सुकटीच्या किंवा सुक्या करंदीच्या किसमूरात, बांगड्याच्या किसमूरात कैरीचा जाडा कीस मिसळून पहा जरूर.
आणि सुकट कांदा करतानाही दोन चमचे कीसलेली कैरी टाका.
सोडेभात करताना सगळं शिजवून झाल्यावर शेवटची वाफ काढण्याआधी तीन चमचे कैरीचा कीस टाकून अलगद भात हलवून घ्यावा.
कालवणात टाकताना मात्र कीस नको- कडेच्या कापाच्या दोन फोडी आणि बाठा एक-दीड लिटर भरेल एवढ्या पातेलभर कालवणाला पुरतात.

चलो अभी एक कैरीसुकटभाकरीची रेसिपी नवीन देतेय.

बाळमुठीएवढी कैरी बारीक किसणीवर किसून घ्यायची.
पांढरीशुभ्र सुकट पाण्यात भिजवून ठेवून, स्वच्छ धुवून मग उपसून पिळून घ्यायची.
चारपाच मिरच्या, दहाबारा लसूण आणि वाडगाभर कोथिंबीर घसरून भरड वाटायचे. ते घालून सुकट किंचित  तेलावर हिंग टाकून फक्त एक मिनिट परतायची. मीठ घालून उतरवायचं. मग त्यात कैरीचा कीस मिसळायचा. चव जरा चाखून बघायची. थोडं खारट लागलं पाहिजे जिभेला. मग त्यात तांदळाचं पीठ घालायचं. सुकटकैरीचा ऐवज गरम असतानाच सगळं एकत्र मळून घ्यायचं.
हाहाहाः

आता जमेल तशी भाकरी नाहीतर कापडावर घालून थालिपीठासारखं थापून तव्यावर घालायची.
तेल सोडून थालिपीठासारखी तळा, नाहीतर भाकरीसारखी कोरडीच भाजा.
हातावर घेऊन खाण्यासारखी चीज. गरम खाल्ली तरी वाहवा. आणि थंड खाल्लीत तरी वावा.

अशाच प्रकारे ओल्या ताज्या कोलंबीला परतून मग तिचा खिमा करून त्याचेही थालिपीठ वा पराठा होईल. तांदळाच्या-ज्वारी पिठात करा थालिपीठ किंवा गव्हाच्या पिठात करा पराठा.
पण कैरी पाह्यजेच हांsss.




Thursday, June 2, 2016

सुक्या जवळ्याचे पॅटिस

ताजाताजा सुकवलेला पांढराशुभ्र जवळा जरासा भिजत घातला की त्याची चव जवळपास ओल्या जवळ्यासारखीच लागते. तशा जवळ्याचे हे एक चटपटित चखणेखाणे.

सहा बटाटे उकडून किसून घ्यावेत. एक मोठाली वाटी भरून सुकाजवळा निवडून, चाळून पाण्यात घालून पाच मिनिटे ठेवावा आणि घट्ट पिळून घ्यावा. एक मोठी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. चार मिरच्या आणि दहा लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घ्यावे. हिंग,एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट, अर्ध लिंबू हे इतर साहित्य हाताशी असावे.

कढई तापवावी. दोन लहान चमचे तेल टाकावे. त्यात हिंग तडतडल्यावर चिरलेल्या मिरच्यालसूण टाकून परतावे. नाकात झिणझिण्या आल्या की सुका जवळा टाकावा. त्यात हळद, मीठ, तिखट टाकून चांगले दणदणीत परतावे. आणि वास परमाळताच गॅसवरून उतरवावे. अर्धे लिंबू पिळून आणि कोथिंबीर, किसून ठेवलेला बटाटा आणि त्यासाठी अर्धा-पाऊण चमचा मीठ आणि हा परतलेला सुका जवळा असे सारे हाताने घोटून मिसळून घ्यावे. आता याचे छोटेछोटे चपटे गोळे करावेत. लोखंडी तव्यात थोडेसे तेल घालून तापू द्यावे. प्रत्येक चपट्या पॅटीला किंचित रव्याच्या अंथरुणात घोळवून त्या तव्यावर मांडाव्यात. बाजूने तेल सोडून  उथळ तळणी करावी.
रंग सोनेरी मातकट येऊ द्यावा.
सोबत चटणी म्हणून कांदा, कोथिंबीर, मिरच्या, मीठ, लिंबू अशी जराशी पातळ चटणी घ्यावी.
मस्त आणि खमंग चखणा म्हणून खावा. नाश्त्यासाठीसुध्दा मस्त आहेच.


Wednesday, May 25, 2016

सोडे मेथी लसूणभात




सोडे, मेथी, लसूण अशा मिश्रणाचा मसालेभातही फार बेफाट लागतो.
दोन कांड्या सोललेला आणि हलकेच ठेचलेला लसूण, लांबलांब पातळ चिरलेला एक कांदा, दोन दिवस भिजत घालून तिसऱ्या दिवशी मोड आणलेले वाडगाभर मेथीदाणे, एक वाटी भिजवलेले आणि अर्धेअर्धे तोडलेले सोडे आणि कुठलाही मोकळा भात होणारा तांदूळ अडीच वाटी धुवून उपसून, एक वाटी तूप, पंधरा मिरीदाणे, तीन लवंगा, दोन दालचिनीचे तुकडे, हिंग, अडीच चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट किंवा पाच मिरच्या उभ्या चिरून, एका लिंबाचा रस, एक मोठा कप भरून नारळाचे घट्ट दूध.
जाड बुडाच्या भांड्यात वाटीभर तूप गरम करीत ठेवावे. त्यावर हिंग टाकावा, किंचित् ठेचलेले मिरीदाणे, लवंग आणि दालचिनी टाकावे. मग पातळ चिरलेला कांदा मातकटगुलाबी करून घ्यावा. त्यानंतर सोललेला, हलकेच ठेचलेला लसूण तुपावर सोनेरी करावा. आता यात सोडे सोडावेत. आणि मग ते जरा कडकडीत झाले की मेथीदाणे टाकावेत. यातच मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ, हळद टाकावे. चांगले हडसूनखडसून सारे मिश्रण परतावे. चांगला वास येऊ लागल्यावर उपसलेला तांदूळ टाकावा. आणि चार वाट्या आधणाचे पाणी घालावे. शिजू द्यावे. भात तयार होत आलासा वाटताच की त्यात. लिंबाचा रस टाकून चांगले हलवून घ्यावे. आणि मंद आचेवर ठेवून झाकण द्यावे. दोन मिनिटांनंतर झाकण काढून नारळाचे दूध घालून हलकेच पुन्हा हलवून घ्यावे. आणि पुन्हा झाकण द्यावे.
दोनतीन मिनिटे वाफ धरली की गॅस बंद करून झाकण तसेच राहू द्यावे.

हा भात खासच पण जरा सौम्य चवीचा. जरा अधिक नटवायचं असेल तर ओले काजू किंवा साधे काजू, केशर वगैरे मंडळींनाही प्रवेश द्यावा.

Tuesday, May 24, 2016

कच्च्या फणसाची भाजी- अर्थात सुकटवाली


कच्च्या फणसाचे दिवस आले की छान नीट हिरव्या रंगावरचा, छोट्या काट्यांचा फणस पारखून घरी आणावा. बऱ्याच लोकांना वाटतं, कच्चा फणस साफ करणं म्हणजे वैताग. खरंय ते. पण जोवर तंत्र माहीत नसतं तोवरच सारं कठीण असतं.
कच्चाच फणस सोलायला बसलात तर वैतागच वैताग. तो चीक हाताला, विळीला, सुरीला लागणार, जमिनीवर, ओट्यावर टपटप सांडणार. मग तो साफ करा. तेल लावून कापाकापी करा... छे- चूक पद्धत.
सोपंय अगदीच. अख्खाच्या अख्खा फणस मावत असेल तर कुकरमधे ठेवावा. नाही मावला तर फारफार तर दोन भाग करून ठेवावा. जाळीच्या खाली भरपूर पाणी आणि फणस ठेवण्याची वेगळी ताटली घ्यावी. फणस चांगला कुकरमधेच शिजवून घ्यावा. पहिली शिट्टी झाल्यानंतर दहा मिनिटं आच कमी करून शिजवावा.
मग तो फणस अलगद काट्याची चामडी काढून टाकून सोलता येतो. त्याचे मध्यम तुकडे करावेत. मधला दांडा किंवा पावरी काढून टाकावीत. फणस खूपच कोवळा असेल तर मधली पावरीही मऊसूत शिजते. फणसात गरे झाले असले, गोडसर वास आला तर मात्र अशा फणसाची साधीच भाजी करावी. सुकट फुकट घालवू नये. चव चांगली येणारच नाही.
शिजलेले तुकडे हाताने नीट कुस्करून घ्यावेत. (अगदी पुल्ड पोर्क किंवा बीफसारखं दिसतं). आता मोर्चा सुकटीकडे वळवावा. आधी अनेकदा सांगितलंय तशी बारीक सुकट नीट निवडून, चाळून मग भिजत घालून, घोळून पुन्हा गाळून घ्यावी. पिळून बाजूला ठेवावी. दोन कांदे बारीक चिरून, दहाबारा लसूण पाकळ्या ठेचून घ्यावेत हिंगहळदतिखटामिठाचे डबेडुबे हाताशी घ्यावेत आणि पाच कोकमं, एक मोठी वाटी बारीक चिरलेली कोथींबीर आणि एक वाटी ताजा खवलेला नारळ...
कढई तापवावी. सढळ हस्ते तेल टाकावे- साधारण पाऊण कप. ते हिंग चर्र होईल एवढे तापले की लसूण. लसूण संतापला की कांदा घालावा. तो शिजून अर्धा झाला की पिळलेली सुकट घालावी. अर्धा चमचा हळद, दोनअडीच चमचे लाल तिखट, दीड चमचा मीठ घालून तळसावे. कोकमे टाकावीत. पाण्याचा हलकासा शिपका द्यावा आणि मग कुसकरलेला फणस घालावा. आता यात आणखी चैन म्हणजे उपलब्ध असल्यास मूठभर ओले काजू टाकायचे. मग हे सारे थोडेसेच परतावे. आणि गॅस बंद करावा. हाताला सोसवेल एवढी भाजी निवली की त्यात कोथींबीर आणि खोवलेला नारळ घालायचा... आणि छान सारे हाताने कुस्करून मिळवून आणायचे.
आणि मग तोंडापोटाशी जुळवून आणायचे...

ही पावसाळ्यापूर्वीची लज्जत हिरवेकच्चे फणस मिळेपर्यंत सुरू रहातो.

Wednesday, May 18, 2016

सुक्या बोंबलाची पथ्याची मिरवणी

सुक्या बोंबलाची मिरवणी हा प्रकार सर्दीने नाकातून फुगे येऊ लागले , ताप झाला नि जेवणावरची इच्छा उडाली अशा वेळी करावा असा.
खडखडीत सुक्या बोंबलाचे दोन-तीन इंची तुकडे एक कपभर किंवा छोटा वाडगाभर घ्यावेत. शक्यतो बारीक बोंबील किंवा नेरल्या म्हणतात तेच बोंबील घ्यावेत. जे जरासे तळसले की आतवर नीट शिजतात असे. जरा वेळ भिजत टाकून मग त्यांच्या पोटांच्या सुकलेल्या पोकळीतून पेरिटोनियमच्या सुकलेल्या काळपट पडद्याचा अंश किंवा जे काही असेल ते नीटच काढायचं. मग एकदम स्वच्छ धुवून सगळं पाणी काढून टाकून फोडणीत पडायला जय्यत तय्यार ठेवावेत. मग एक मोठ्ठी अख्खी लसणाची कांडी सोलून जबरी ठेचून घ्यावी. चार चमचे मिरी ताजीताजी पूड करून घ्यावी.
उगीच फोडणीसाठी पातळसं अंथरूण म्हणून लहानसा अर्धा कांदा अगदी बारीक चिरायचा.
साफसूफ केलेली, धुतलेली कोथिंबीर उदारपणे बचकभर घ्यावी, त्यात चारपाच चांगल्या भरवशाच्या तिखट हिरव्या मिरच्या घालून ते सारं बारीक वाटावं. चारपाच कोकमं हाताशी ठेवावीत. मीठ, हळदही.
आता पातेलं तापत घालावं, आणि दोन लहान चमचे साजूक तूप फोडणीसाठी घालावं. आता तय्यार रहायचं फटापट सगळे जिन्नस तळसायला, घोळसायला.
तापल्या तुपावर हिंगाच्या काळजात चर्र होतंय तोवर सफा ठेचलेला लसूण टाकायचा. तो जरासा ओशाळला की वर कांदा टाकायचा. त्याचा तोंडाचा रंग पार उतरला पाहिजे. साला रडवतो काय आम्हाला... तो झाला की मग आपले साफसूफ केलेल बोंबील घालून आच कमी न करता घाईघाईने हलवत रहायचं. त्यावरच बारीक केलेली मिरीभुक्की, हळद मीठ आणि कोकमं घालून टाकायची. साऱ्या घराच्या कानाकोपऱ्यात बोंबीलमिरीलसणाचा खरपूस वास उधळेपर्यंत तळसत रहायचं. आणि मग आपल्यालाच आता सटासटा शिंका- ठसके येणार म्हटल्यावर कोथिंबीरमिरचीचं वाटण टाकून दोन पेले पाणी लोटून द्यायचं.
मग अख्खी तीन मिनिटं रटरट रटरट. मग मिरवणी तय्यार.
गरम  मऊ किंवा साध्या भाताबरोबर ओरपून खायची, किंवा तांदळाची भाकरी कुस्करून खायची. नाकात चोंदलेली सर्दी, घशात वाजणारा कफ सगळा सुट्टा होतो. खोबरं नाही, जास्त तेल नाही. 
आणि गंधसुगंध आहाहाहा... तेथे पाहिजेत खाणारे जातीचे सर्दीमान...