Tuesday, May 24, 2016

कच्च्या फणसाची भाजी- अर्थात सुकटवाली


कच्च्या फणसाचे दिवस आले की छान नीट हिरव्या रंगावरचा, छोट्या काट्यांचा फणस पारखून घरी आणावा. बऱ्याच लोकांना वाटतं, कच्चा फणस साफ करणं म्हणजे वैताग. खरंय ते. पण जोवर तंत्र माहीत नसतं तोवरच सारं कठीण असतं.
कच्चाच फणस सोलायला बसलात तर वैतागच वैताग. तो चीक हाताला, विळीला, सुरीला लागणार, जमिनीवर, ओट्यावर टपटप सांडणार. मग तो साफ करा. तेल लावून कापाकापी करा... छे- चूक पद्धत.
सोपंय अगदीच. अख्खाच्या अख्खा फणस मावत असेल तर कुकरमधे ठेवावा. नाही मावला तर फारफार तर दोन भाग करून ठेवावा. जाळीच्या खाली भरपूर पाणी आणि फणस ठेवण्याची वेगळी ताटली घ्यावी. फणस चांगला कुकरमधेच शिजवून घ्यावा. पहिली शिट्टी झाल्यानंतर दहा मिनिटं आच कमी करून शिजवावा.
मग तो फणस अलगद काट्याची चामडी काढून टाकून सोलता येतो. त्याचे मध्यम तुकडे करावेत. मधला दांडा किंवा पावरी काढून टाकावीत. फणस खूपच कोवळा असेल तर मधली पावरीही मऊसूत शिजते. फणसात गरे झाले असले, गोडसर वास आला तर मात्र अशा फणसाची साधीच भाजी करावी. सुकट फुकट घालवू नये. चव चांगली येणारच नाही.
शिजलेले तुकडे हाताने नीट कुस्करून घ्यावेत. (अगदी पुल्ड पोर्क किंवा बीफसारखं दिसतं). आता मोर्चा सुकटीकडे वळवावा. आधी अनेकदा सांगितलंय तशी बारीक सुकट नीट निवडून, चाळून मग भिजत घालून, घोळून पुन्हा गाळून घ्यावी. पिळून बाजूला ठेवावी. दोन कांदे बारीक चिरून, दहाबारा लसूण पाकळ्या ठेचून घ्यावेत हिंगहळदतिखटामिठाचे डबेडुबे हाताशी घ्यावेत आणि पाच कोकमं, एक मोठी वाटी बारीक चिरलेली कोथींबीर आणि एक वाटी ताजा खवलेला नारळ...
कढई तापवावी. सढळ हस्ते तेल टाकावे- साधारण पाऊण कप. ते हिंग चर्र होईल एवढे तापले की लसूण. लसूण संतापला की कांदा घालावा. तो शिजून अर्धा झाला की पिळलेली सुकट घालावी. अर्धा चमचा हळद, दोनअडीच चमचे लाल तिखट, दीड चमचा मीठ घालून तळसावे. कोकमे टाकावीत. पाण्याचा हलकासा शिपका द्यावा आणि मग कुसकरलेला फणस घालावा. आता यात आणखी चैन म्हणजे उपलब्ध असल्यास मूठभर ओले काजू टाकायचे. मग हे सारे थोडेसेच परतावे. आणि गॅस बंद करावा. हाताला सोसवेल एवढी भाजी निवली की त्यात कोथींबीर आणि खोवलेला नारळ घालायचा... आणि छान सारे हाताने कुस्करून मिळवून आणायचे.
आणि मग तोंडापोटाशी जुळवून आणायचे...

ही पावसाळ्यापूर्वीची लज्जत हिरवेकच्चे फणस मिळेपर्यंत सुरू रहातो.

1 comment:

  1. awesome... and mouthwatering.
    i think i will sure try this!
    keep posting

    ReplyDelete