Friday, May 6, 2016

केळफुलाची सोडे घातलेली भाजी

एकदा कोस्टा रिकात केळी निर्यातदाराच्या अॅग्रोफॅक्टरीत गेले होते. केळ्याचे लोंगर लादून बागेतून कारखान्यात येणारी हूक-ट्रेन पाहातापाहाता गेलो बागेत. तिथली आडवीतिडवी पसरलेली केळीची बाग एकदम भारतातच आल्यासारखं वातवरण वाटलं. तिथं फेकून दिलेल्या पण खराब नसलेल्या केळ्यांचा नि सोबत केळफुलांची पखरण पाहिली. गाईडला विचारलं याचं तुम्ही काय करता- तर म्हणाला कंपोस्ट. तरीही विचारलं- ही भाजी करून खाता येतात. तुम्ही नाही खात? ही काय वेडीबिडी बाय हाय काय अशा नजरेने तो बघू लागला. पण त्याने विचारलं कशी करतात भाजी? एक केळफुल घेऊन ते कसं साफ करायचं ते दाखवलं थोडी फण उलगडून. तो म्हटला छ्याछ्या- एवढा वेळ आमच्या देशात कुणाला नाही. एवढी किचकट भाजी कोण करणार! म्हटलं राहिलं बाबा... आम्ही वेळात वेळ काढून करतो ही भाजी. काढलेल्या वेळफुलाची केळफुलाची भाजी फार मस्त लागते भौ.
तर केळफुलाची भाजी महाराष्ट्रात करतातच.
केळफुलाच्या लाल चामडी पाकळ्या काढून टाकायच्या आणि आतल्या फण्यांमधून एकेक फूल सुटं करून मधला कडक चामट पुंकेसर काढायचा नि त्या साऱ्या केसरांना झाकणारी पारदर्शक प्लास्टिकसारखी पंखुडीही काढायची. मग अगदी लालगुलाबी पाकळी निघायला कठीण गेली की थांबायचं. हा राहिला पिवळट सायीच्या रंगाचा आतला कोका. निवडलेली फुलं आणि हा कोका बारीक चिरून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचा तेव्हा कुठे दुसऱ्या दिवशी ही नखऱ्याची भाजी करून खाता येते.
आता एवढी मेहनत केल्यानंतर ही भाजी कुणी काळे वाटाणे, कुणी वाल, कुणी हरभरे, कुणी चणाडाळ घालून करतात.
चांगली लागते कशीही पण सगळ्यात त्या भाजीचं चीज होतं ते सोडे घालून केल्यावरच.
भाजी करण्यापूर्वी पाण्यात भिजत घातलेलं चिरलेलं केळफूल बारीक जाळीच्या चाळणीत उपसून ठेवावं. पाणी गेलं पाहिजे.
एका केळफुलाच्या ऐवजाला एक लहानवाटीभरून चांगले सोडे घ्यावेत.
सोडे जरा तोडून अगदी लहान तुकडे करावेत. आणि पाण्यात भिजत घालावेत.
एक दांडगा कांदा किंवा दोन मध्यम कांदे बारीक चिरून घ्यावेत. दहा लसणाच्या पाकळ्या सोलून पार ठेचून घ्याव्यात.
आता कढईत अर्धी वाटी तेल तापवावे. चिमूटभर हिंग टाकताच लसूण टाकून परतावा. तो जरासा पिवळटतांबूस झाला की बारीक चिरलेला कांदा टाकावा. आणि तो अगदी छान गुलाबीलालसर होईपर्यंत परतून घ्यावा. पाण्यातून सोडे बाहेर काढून पिळून घ्यावेत आणि कांद्यावर टाकावेत.  सरासर परतावेत. त्यात अर्धा चमचा हळद. एक भलाभक्कम चमचा लाल तिखट. बडीशेपेची पूड अर्धा चमचा. मीठ असं घालून पुन्हा परतावं. मग चार चांगली लालभडक कोकमं किंवा नसतील तर दोन चमचे चिंचेचा कोळ घालून पुन्हा ठसका उधळेपर्यंत परतावं.
हे एव्हाना तसंच खायला घेण्यासारखं शिजलेलं असतं. पण आपल्याला केळफुलाची भाजी खायचीय हे लक्षात ठेवून ते आधीच हावरटपणा करून खाऊ नये. तर... आता यात चिरलेलं केळफूल घालावं आणि चांगलं तळसत रहावं. थोडा वेळ झाकणही द्यावं. पुन्हा उघडं ठेवून जराजरा हलवत शिजू द्यावं.
आता यात एक वाटीभर खवलेला ओला नारळ आणि  अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा हलवावं.
करण्या-जेवण्या मधे फार वेळ जाणार असेल तर ओला नारळ आणि कोथिंबीर जेवायला बसतानाच टाकावी. आणि ती नसेल तरीही काही फारसं बिघडत नाही. पोत जरासा वेगळा होतो. पण चव बेफाट मस्त असते.
करो दोस्तों,


कर के चखो.





1 comment:

  1. मस्त करायला पाहिजेच. आमची आई फक्त केळफुलाची भाजी करायची. मी करून बघणार आता.

    ReplyDelete