भट म्हणाला भटणीला अर्धा बोंबील चटणीला असं उगीच म्हटलं जात असलं तरीही बोंबलाची चटणी करायची तर शेकडाभर बारीक बोंबील किंवा वीसपंचवीस जाडे बोंबील तरी हवेतच.
आधी सांगितल्याप्रमाणेच जाडे बोंबील उभे तोंडापासून शेपटीकडे असे विळीवर चिरून घ्यावेत आणि त्यांचे तीनतीन इंचाचे तुकडे करावेत. बारीक बोंबील किंवा नेरल्या असल्या तर मग काही प्रश्नच नाही.
हे बोंबील पर, पोटाकडचं काहीबाही राहिलेलं काढून स्वच्छ करून घ्यायचं. आणि मग पळीभर तापलेल्या तेलात चिमटीभर हिंग टाकून आधी बचकाभर लसूण परतून मग त्यावर ते बोंबलांचे तुकडे चांगले खरपूस परतायचे.
आता पर्याय देते.
१- हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे तळून घ्यावेत
किंवा
२- लाल मिरच्यांचे मोठे तुकडे परतून घ्यावेत
किंवा
३- सरळ साधं लाल तिखट घ्यावं.
तिखट आपल्या तोंडाच्या क्षमतेप्रमाणे. आणि इतरत्रही किती झेपेल याचा विचार करूनच घ्यायचंय- मग ते हिरव्या मिरचीचं असो लाल मिरच्यांचं असो वा लाल तिखटाची भुक्की असो.
हे सगळं मिश्रण जरा गार होऊ द्यावं.
त्यात चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा आमचूर वा पाचसहा आंबोशीचे तुकडे घालावेत.
आता ते खलबत्त्यात कुटायचं तर कुटत बसा.
नाहीतर ग्राइंडरवर नीट लक्ष देऊन अगदी तीनचार सेकंद फिरवत फिरवत रहा. अंदाजाने. अगदी चूरचूर होता कामा नये. किंचित तुकडे रहायला हवेत.
पण आपल्याला अगदी बारीक भुस्सा चटणी आवडत असेल तर तसं करावं.
-
आता याचंच एक वेरिएशन.
बोंबलांचे तुकडे आणि लसूण भरपूर तेलावर परतूनपरतून घ्यावेत. ते गरम असतानाच त्यावर लाल तिखट आणि आमचूर पूड भुरभुरून मिसळावी.
हा झाला चखणा.
उंची मद्यासवेही छान.
आणि उगीच कधीही तोंडात टाकायलाही छान.