Saturday, December 5, 2015

सुक्या मासळीचे जग...

सुकटायन
या विषयावर लिहिण्याची गरज का भासली यासंबंधी थोडेसे सांगायचे आहे.
सुकी मासळी हा अनेक लोकांच्या खाण्यातला पदार्थ आहे. त्या वासाने त्यांची रसना खवळते, आणि भूक भागतेच पण तरीही अनेकदा ही काहीतरी गरीब वस्तू आहे असे उगीच मनाने घेतलेले असते. डब्यात, जेवणात सुक्याचं आहे याबद्दलची थोडी लाज कशी कुठून पण हे नित्य खाणाऱ्या अनेक लोकांच्या मनात शिरलेली आहे.
खरं म्हणजे सुक्या मासळीतून पचायला अतिशय सोपी अशी प्रथिनं मिळतात. ताजी मासळी, कोंबडी-मटण- इतर उपलब्ध प्राण्यांचे मांस, दूध, अंडी आणि अगदी कडधान्ये-डाळी यांच्यापेक्षाही यातून मिळणारी प्रथिने स्वस्त पडतात याचं कारण म्हणजे दर्यादिली... त्या जलधीचं, समुद्राचं देणंच इतकं उदारधी असतं की कोळंबीचे सोडे वगैरेंसारखी एखाददुसरी चीज सोडली तर बाकी सारं मुबलक आणि म्हणून तुलनेने स्वस्त असतं.
आणि गेल्या पाचशे वर्षांतले अगदी लिखित संदर्भ सापडतात (आणि त्याआधीचे अंदाजाने ठरवता येतील) की मासे सुकवून, खारवून खाण्याची पध्दत जगभर अनेक समाजांत होती. जेव्हा ताजी मासळी नसेल तेव्हा अशी खारवून, धुरवून, सुकवून ठेवलेली मासळी खाण्याचा प्रघात सर्वत्र होता.
किनाऱ्यावरील साऱ्या गावांतून ओल्या मासळीच्या विक्रीसोबतच अतिरिक्त ओल्या मासळीवर सोपस्कार करून सुकी, बेगमीची मासळी करण्याचे काम सतत सुरू असते. अपवाद केवळ पावसाळी तीन महिन्यांचा.
मांसाहारी आहेत पण त्यातही मनापासून प्रेम मत्स्याहारावरच असे खवय्ये खूप असतात. भर पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते तेव्हा मासे नाही मिळाले तरी तोंड सुकू नये म्हणून पूर्वापारपासून मासे वाळवून ठेवण्याची पध्दती या खवय्यांच्या पूर्वजांनी पक्की करून ठेवली. विशेषतः ऑक्टोबर ते एप्रिल या खणखणीत उन्हाच्या किंवा कोरड्या हवेच्या, वाऱ्याच्या मौसमांत दर्याची दौलत उन्हात पसरून, टांगून, मीठ लावून, वाळवून ठेवण्याचं कसब माणसाने हस्तगत केलंय.
सुक्के खडखडीत वाळलेले बोंबील भारताची खासियत. बारीक जवळा, करंदी, सोललेली कोळंबी, मोतकांसारखे लहान मासे, वाकट्या, छोटी पापलेटं, मांदेली, कालवं, तिसऱ्यांच्या आतलं मांस, माखली, बांगडे, मोठे मांसल मासे असं सारं काही फार निगुतीने या काळात वाळवून ठेवलं जातं.
गोड्या पाण्याचे मासेही खारवून सुकवायची पध्दत आहे. एका विशिष्ट लोकसमूहाचे लोक प्रवास करतकरत आंध्रमधून महाराष्ट्रात येतात. आणि तलावांतून फक्त दोनच विशिष्ट जातीचे मासे पकडतात. जाळ्यात गावलेले इतर जातीचे मासे ते तेथील ग्रामस्थांना देऊन टाकतात. पण या दोन जातींचे मासे तिथेच वाळवून मग हैदराबादेत वगैरे नेऊन विकतात. ती तिथली स्पेशल मागणीची चीज असल्यामुळे चांगला भाव मिळतो. मध्य प्रदेश, नागपूर पट्ट्यात अर्धवट सुकवून भाजलेली तलावाची एक मासळी लोक फार आवडीने कालवणासाठी विकत घेतात.
पण मुख्यतः सुकी मासळी म्हणजे समुद्राचीच.
मासळी वाळवताना तीव्र दुर्गंध येतो. तो एक मधला टप्पा असतो. जीवनावर जगणारे इतर जीव या मासळीवर ताबा जमवू पाहातात त्यामुळे सडण्याची प्रक्रिया सुरू होऊन दुर्गंध येऊ लागतो. पण मग कृपाळू सूर्याचे कडक ऊन सडण्याची प्रक्रिया सुरू करणाऱ्या त्या जीवाणूंचा खात्मा करून टाकतं आणि दुर्गंध जाऊन केवळ तीव्र असा वास उरतो. पट्टीचे खाणारे त्या वासाच्या तीव्रतेवरून ओळखतात कुठली सुकी मासळी उत्तम दर्जाची नि कुठली निम्न. कुठली साठवणीसाठी घ्यायची नि कुठली थोडीशीच घेऊन संपवून टाकायची.

सातत्याने कडक ऊन मिळालेली सुकी मासळी दिसायला आकर्षक चकचकीत दिसते. तिच्या पृष्ठभागावर चिकट थर नसतो. ती नाकाजवळ नेऊन पाहिली तर तिचा वास किंचित भाजल्यासारखा येतो, कारण थेट सूर्यानेच तिला भाजून काढलेलं असतं. वईस- हा एक खास शब्द... आहे मत्स्याहाऱ्यांच्या चलनातला. वईस म्हणजे सडण्याची प्रक्रिया रेंगाळल्यानंतर राहून गेलेला वास. मासळी मारल्यानंतर मधे किती काळ गेला यावरही तो वास अवलंबून असतो. तिच्यात ताबडतोब बर्फ किंवा मीठ पडले होते का, किंवा वाळवण्यासाठी तिला ताबडतोब कडक ऊन मिळालं होतं का, ती नीट सुटीसुटी पसरली होती का अशा अनेक घटकांवर त्या वासाचा कमीजास्तपणा अवलंबून असतो. पण या वासामुळेच सुक्या मासळीला कमी समजले जाते. आपल्या देशात तर शाकाहार श्रेष्ठ मानण्याचा विश्वास उच्चवर्ण-नीचवर्ण या कालबाह्य पण अजूनही जीवनांतून हद्दपार न होणाऱ्या संकल्पनांशी जोडलेला आहे. त्यात रक्तमांसाचे दर्शन आणि दुर्गंध किंवा वेगळा गंध या काही गोष्टींची भर पडून मांसाहार, मत्स्याहार म्हणजे हीन मानण्याचे औद्धत्य तथाकथित उच्चवर्णीय आणि नैतिक उच्चासनांवर स्वतःला बसवून फुले वाहणारे अनेक लोकसमूह दाखवत असतात.

3 comments:

  1. मासे : एक जबरदस्त अवतार !
    थँक यू मुग्धाजी !!

    ReplyDelete
  2. मासे : एक जबरदस्त अवतार !
    थँक यू मुग्धाजी !!

    ReplyDelete