Sunday, December 6, 2015

सुकटायन भाग ३


हे वरचं चित्र आहे व्हॅन गॉचं. ब्लोटर्स ऑन येलो पेपर या नावाचं हे चित्र. व्हॅन गॉला कां बरं काढावंसं वाटलं असेल हे चित्र? तोही या सुक्या मासळीचा आस्वाद घेणारा असेल का? माहीत नाही...

पण जगभर, थंड प्रदेशांत, उष्ण कटिबंधांत विविध मासे खारवून, धुरवून, सुकवून जेवणात वापरले जातात. त्यातलेच हे ब्लोटर्स. अख्खे भिंगी-पाल्याच्या प्रजातीतले हेरिंग मासे धुरवून सुकवतात, त्यांना ब्लोटर्स म्हणतात. ते मासे मधे आडवे चिरून उलगडून धुरवले की ते किप्पर्स म्हणवले जातात. डोकं नि पोटातली आतडी वगैरे काढून वाळवली की ते बक्लिंग. आफ्रिकेत बोय किंवा म्युलेट जातीचे मासे आधी खारट पाण्यात भिजत घालून मग धुरवून सुकवून खाल्ले जातात त्यांना बोक्कॉम म्हणतात. शिवाय मोरी(शार्क) माशाचे लांब तुकडे वाळवून, धुरवून गोमांसाच्या बिल्टॉन्गप्रमाणे खाण्याची पध्दत आहे.
जपानमध्ये तर सुकवलेल्या माशांची फार मिजास राखली जाते. कात्सुओबुशी नावाची सुकवलेल्या माशांची फार लाडकी डिश असते जपान्यांची. तिची प्रक्रिया भयंकर क्लिष्ट आणि वेळकाढू आहे. पण खवय्यांचे लाड पुरवणारे कितीही कष्ट उपसतात खरे.
आपल्याकडेही मोठ्या माशांची अशी अख्खी किंवा मधे चिरून सुकवण्याची पध्दत आहेच. पापलेट, सुरमय. रावस, दाडा, मोरी हे सारे मासे खारवून सुकवून वापरतात त्याला सरसकट खारं म्हटलं जातं. पण पापलेटचं खारं, सुरमयचं खारं असं म्हटलं जातं.
पश्चिमेकडच्या थंड बर्फाळ देशांत गावांकडे असे सुके मासे साठवण्यासाठी धुराची खोली वेगळीच करतात. बहुधा तळघरात. 
आपल्याकडे भरपूर ऊन-वारा असल्यामुळे साठवणीचा तेवढासा प्रश्न येत नाही. पण तरीही स्वच्छतेच्या दृष्टीनेसुकी मासळी साठवताना तर काही काळजी घ्यावीच लागते. त्याला अजिबात दमट हात लागता कामा नये. भरण्याचा डबेही दमट नसावेत. डबे थोडे तापवून घ्यावेत. आतून तळाला एकादा वृत्तपत्राचा किंवा टिश्यूचा कागद घालावा. लाल सुक्या मिरच्यांचा एकथर लावावा आणि जवळा, करंदी, सोडे, साफ केलेल्या, डोकी काढलेल्या बोंबलांचे तुकडे, मासु सुकट, वाकट्या, तिसऱ्या-माखली-कालवं, बांगडे जो काही सुका माल असेल तो भरावा. भरताभरता अधेमधे तिरफळं घालत रहावं. आणि डबे भरून झाल्यावर अगदी वर पुन्हा एक थर लाल सुक्या तिखट मिरच्या पसराव्यात. एवढे केले की सुक्या मासळीला मुंग्या लागत नाहीत. शिवाय तिरफळांच्या वासामुळे त्यात पाखरेही होत नाहीत. तिरफळांचा वापर डाळी, कडधान्ये, तांदळालाही पोरकिडे, सोंडकिडे, भुंगा लागू नये म्हणून करतात. यातलं गमक काय- अशा कोणत्याही धान्यावर किंवा मासळीवरही काही पाखरे ती वाळत असतानाच अंडी घालून गेलेली असतात. त्यांना थोडा दमटपणा मिळाला की आपल्याला वाढ व्हायला अनुकूल हवा झाली असे उपजत संज्ञेने समजून ती अंडी फुटतात. आणि एका जीवाचा दुसऱ्या जीवाच्या आधाराने जीवनप्रवास सुरू होतो. मग प्रथम अळ्या होतात. मग त्या कोषात जातात. आणि मग त्यातून वाढलेला किडा किंवा पाखरू बाहेर पडते. तिरफळाच्या तिखट वासामुळे आपल्याला ही हवा अनुकूल आहे असे अंड्यांच्या संज्ञेला कधीच वाटत नाही. आणि त्यातून अळ्या बाहेरच पडत नाहीत. जे सुक्या मासळीचं तेच धान्याचं. फक्त प्रत्येक प्रकाराबरोबर सहजीवन असलेले जीव वेगवेगळे असतात इतकंच.
सुके बोंबील, मोठ्या माशांचं खारं, सुके बांगडे बहुतांशी दांड्यांवर किंवा जमिनीच्या थोडं वर रहातील अशा तऱ्हेने वाळत घालतात. त्यामुळे त्यांना वाळू चिकटलेली नसते. पण हे मासे वाळत पडेपर्यंत त्यांवर काही उडते कीटक अंडी घालून जातातच. आपल्या पुढच्या पिढीच्या वाढीची तजवीज करणे हा आद्य जीवनहेतूच त्यामागे असतो. त्यामुळे हे मासे साठवतानाही सुक्या मिरच्या, तिरफळे यांचा वापर भरपूर करावा. डबाबंद करण्यापूर्वी स्वतः एकाददुसरे कडकडीत ऊन द्यावे.
सुक्कं खाणाऱ्या कसलेल्या घरांतून खारे साठवताना तर आणल्यानंतर केवढीतरी मेहनत घेतली जाते. प्रथम खाऱ्याचे बेताचे तुकडे करून ते खसखसून धुतले जातात. मग ते तुकडे पुन्हा एकदा जबरी सुवासाच्या हळदीने आणि जाडसर मिठाने खसखसून चोळले-घोळले जातात आणि मग कडकडीत उन्हात दोन दिवस पाचपाच तास वाळवले जातात.
सुरमई, रावस, पापलेट, दाडा अशा महागामोलाच्या माशांचे खारे निगुतीनेच साठवावे लागते. फूडग्रेड प्लास्टिकच्या बरणीत असे सर्व सोपस्कार केलेले खारे भरावे. त्यात वर टिश्यूपेपर घालावेत आणि बरणी घट्ट बंद करून तिला शक्यतो त्याला रेफ्रिजरेटरमधेच मानाचे स्थान द्यावे. इतर सुकी मासळीही अगदी क्वचितच ज्यांना खायची असते त्यांनी थोडीशी सुकी मासळी प्लास्टिकच्या झिपबॅगमधे किंवा फूडग्रेडच्या प्लास्टिक बरणीत भरून फ्रीजमधेही ठेवायला हरकत नाही. भरपूर आणि अनेकदा खाणारांच्या घरात मात्र साठवणीचे मोठेच डबे लागतात.
हे डबे जिथे ठेवायचे त्या रॅक्सवर, कपाटांमधे डब्यांच्या तळाभोवतीही थोड्या लाल सुक्या मिरच्या विखरून ठेवाव्यात. म्हणजे स्काउटिंग करणाऱ्या मुंग्या त्यांच्या वाटेला जाणार नाहीत.

No comments:

Post a Comment