Tuesday, December 8, 2015

सुकटायन सुकटमेथीवाला भाग ५

सुकट-मेथी उसळ
एक मोठी वाटी मेथीचे दाणे भिजत घालावेत. दोन दिवस पाणी बदलून बदलून भिजू द्यावेत. तीन दिवस भिजले तरीही चालतात. इतर कडधान्यांप्रमाणे पाण्यातून उपसून काढू नयेत. पाणी असू द्यावे. मग तिसऱ्या दिवशी मोड आलेली ही मेथी चाळणीवर काढावी. एक मोठी वाटी भरून सुका जवळा नीट निवडून पाण्यात भिजत घालावा. दोन तीन मिनिटांनी चाळणीवर धुवून पिळून घ्यावा. दोन कांदे बारीक चिरावेत. दहाबारा लसूणपाकळ्या छान ठेचाव्यात.
तेलावर हिंग तडतडला की लसूण घालायचा, कांदा अगदी नीट परतायचा. कचवट ठेवायचा नाही. चांगला परतला गेला की मग त्यावर एक चमचा हळद, दीड चमचा तिखट, एक चमचा मीठ, अर्धा चमचा बडीशेप पूड, अर्धा चमचा धणे पूड आणि चार कोकमं टाकावीत आणि मग त्यावरच जवळा टाकून नीट खडसावून परतावा. झणका उठला की मेथीचे जाणे टाकावेत. एक चमचा आलं लसूण वाटण टाकावं. एक मोठा पेलाभर पाणी टाकून हे सारं चांगलं शिजू द्यावं. पाचच मिनिटात मेथी छान शिजतेच. ती शिजली की जाळ विझवून भरपूर किंवा हाताशी असेल, टाकायची असेल तितकी कोथिंबीर बारीक चिरून टाकावी.
ही सुकटमेथीची उसळ खायला झकास लागतेच. कुणीही खावी. पण मधुमेही, कंबरदुखीचा त्रासवाले, बाळंतिणी या सर्वांसाठी फारच चांगली.
अशाच प्रकारे मोड आलेली मेथी आणि सोडे घालून भातही छान होतो. सोड्यांचे पदार्थ सुरू होतील तेव्हाच लिहीन त्याबद्दल.
सुकट घातलेल्या भाज्या-
सुकट-वांगं
बारीक सुकट एक वाटी. दोन कांदे बारीक चिरून. दहाबारा पाकळ्या लसूण चांगलाच ठेचून, तीनशे ग्राम वांगी- काटेवांगी, लांबडी वांगी, वसईची वांगी, अगदी लोण्यासारखी शिजणारी भरताची- वांगी कोणतीही चालतील- बारीक बोटपेराएवढी चिरून किंवा उभट मोठ्या फोडी करून, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, दीड चमचा मीठ, दोन चमचे आलंलसूण वाटण, एक चमचा धणे-बडीशेप पूड, चार कोकमं, हिंग.
अर्धी वाटी तेल तापवावं. हिंग तडतडल्यावर ठेचलेला लसूण सोनेरी होईलसा परतावा. कांदा चांगला परतून घ्यावा. परतून झाला की त्यात धुवून पिळलेली सुकट घालावी. हळद, तिखट, मीठ, धणेबडीशेप पूड, घालून तिला चांगली खवळू द्यावी. मग वांग्याच्या फोडी टाकून जोरदार आंचेवर परताव्यात. एक दोन शिंका आल्या की त्यात आलंलसणाचं वाटण टाकून लगेच दोन फुलपात्र पाणी घालावं. वांगी मऊ शिजली की मगच चार कोकमं टाकून पुन्हा एक उकळी काढावी. या भाजीचा पातळपणा आपल्याला हवा तसा ठेवावा. अंगासरसं पाणी किंवा थोडक्यात त्याच्याशी भात जेवायचा असेल तर कोथिंबिर-आलं-लसणाचं वाटण जरासं वाढवून जास्त पाणी ठेवावं.

मसाल्यात तळलेल्या सोड्यांचं जाडसर कूट मिसळून भरली वांगी करतात. पण सोडे नसलेच तर हीच बारीक सुकट तेलावर चांगली खरपूस तळून तिची पूडही मसाल्यात कालवून भरली वांगी करता येतात. 
पण ती सिध्दी सोड्यांच्या बरोबरच द्यावी नाही कां...
पुरवूनपुरवून ज्ञान द्यावे- कसे?!

3 comments:

  1. मस्तच. सुकट/सोडे-वांगी किंवा सुकटीसह इतर भाज्या माहित होत्या पण ही सुकट-मेथी पहिल्यांदाच बघतीये. नक्कीच करून बघणार. धन्यवाद मुग्धा ताई.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, एकदम मस्त लागते.

      Delete
  2. उद्यापासून माझे प्रयोग सुरु होणार मुग्धताई ...
    नुसतं वाचून वाचून जीव खवळलाय

    ReplyDelete