एक अनुभव लिहायचा मोह होतो. गरीब स्तरातील लोकांच्या वस्तीत काम
करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचं एक शिबिर होतं. आणि एका मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या पोषक आहार
विभागाने त्यांचे पोषक आहार संबंधाने प्रशिक्षण आयोजित केले होते. तीन दिवस
पालेभाज्या खा, मोड आलेली कडधान्ये खा, वगैरे जप सुरू होता. सारा भर शाकाहारी
आहारावरच होता. मात्र शेवटच्या दिवशी माझे भाषण ठेवले होते (चूकच
केली!). मी या
कार्यकर्त्या श्रोत्यांना विचारले की सर्वसाधारणपणे तुमच्या वस्तीत सुकी मासळी
खाल्ली जाते का. याचे उत्तर चटकन् हो असे आल्यानंतर मी सांगितले की बाकीच्या
आहारासोबत या घटकाचे आहारातले प्रमाण थोडे वाढेल, घरातल्या मुली-बाया या सुध्दा ते
व्यवस्थित खातील यासंबंधी प्रबोधन करा. मुंबईत मिळणाऱ्या पालेभाज्या गटाराच्या
पाण्यावर वाढलेल्या असल्यामुळे त्यातून मिळणारे पोषण कमी आणि प्रदूषण जास्त अशी
परिस्थिती आहे. मोडाची कडधान्येही शिजवून खावीत कारण ती पचायला जड असतात.
ज्यांच्या आहारात मांस हा पदार्थ खूप जास्त आहे त्यांनी कच्ची मोडाची कडधान्ये
खाणे योग्य, बाकीच्यांनी नाही... वगैरे. यातील सुक्या मासळीच्या उल्लेखानेच
कार्यकर्ते खूष झाले होते. आणि शिक्षणसंस्थेतील अभिजन प्राध्यापक अस्वस्थ.
असाच एक अनुभव एका ग्रामीण शिबिरातही आलेला. पोषक आहाराबद्दल
शिकवणाऱ्या तज्ज्ञांनी जे सांगायला सुरुवात केली त्यात या ग्रामीण महिलांना रसच येत
नव्हता. पण मग मी त्यांना सुकट-बोंबील-खारं याच्या नव्या कृती ऐकायच्या का
विचारल्यावर जो काही होकाराचा स्फोट झाला त्यामुळे आहारतज्ज्ञ दिग्मूढ झाले होते.
त्या शिबिरातील महिलांना मी सुकी मासळी करताना ती स्वच्छ कशी करावी, त्याचा वापर
कसकसा करता येतो, पाककृती वगैरे बरंच काही सांगितलं. खूष होत्या त्या बायका.
तर अशी ही आनंददायी सुकी मासळी कशी करावी याची थोडीच महत्त्वाची पथ्य
असतात. ती पाळली की सुक्या मासळीचा तीव्र वास नाकाला सुखवणारा, रसना खवळवणारा
सुगंध बनतो.
शिजवताना मासळीचा किंवा सुक्या मासळीचा हा विशिष्ट वास काढण्याचे तीन
हमखास संस्कार-सोपस्कार असतात. स्वच्छ धुणे, मसाल्यात भरपूर लसूण, हळद, कोकम किंवा
चिंच असणे, आणि जोरदार आगीवर शिजवणे.
पुढे एकेका माशाच्या प्रकारांचे वर्णन येईल. ते साठवण्यासंबंधी सूचना
येतील. ते शिजवण्याच्या पध्दती येतील. काय टाळावे, काय काळजी घ्यावी हे सुध्दा
सांगितले जाईल.
जवळा, करंदी किंवा अंबाडी, मांदेली, मासु सुकट किंवा दांडी सुकट,
माखली वगैरे माल वाळूमिश्रित जमिनीवर वाळत पडलेला असतो, त्यामुळे यात आपोआप थोडी
वाळू चिकटून आलेली असते. आजकाल प्लास्टिकच्या धांदोट्या समुद्रभर विहरत असतात.
समुद्राच्या घुसळणीत त्या धांदोट्यांचे आणखी बारीकबारीक तुकडे होत असतात. अगदी
पातळ प्लास्टिकचे हे तुकडे माशांच्या थव्यात मिसळलेले असतात. आणि मासळी वाळताना
त्याच्यासोबतच हे प्लास्टिक वाळून कुडकुडीत होते. हे प्लास्टिक नीट निवडून काढावे
लागते. या शिवाय जवळ्याच्या, करंदीच्या थव्यात श्रिम्प जातीचेच काही वेगळे जीवही
घुसलेले असतात. ते वेगळे ओळखूही येतात. अगदी पारदर्शक
प्लास्टिकसारखे कडक डोके असलेल्या या जातीच्या श्रिम्प्सना निवडून बाजूला काढलेले
चांगले. कारण त्यांचा कडकपणा जीभ कापू शकतो, पोटालाही थोडा त्रास देऊ शकतो. मूठभर
सुक्या जवळ्यात एखाददुसरा असला श्रिम्प सापडतोच. जवळ्याच्या थव्यात घुसलेले अनेक
बारीक मासे त्यासोबतच वाळतात. आपल्या आवडीप्रमाणे ते निवडून काढावेत किंवा तसेच
ठेवावेत. हाताला चरचरीत लागणारे रुंद मासे सरळ वेचून काढावेत. अगदी बारीक मासे
पोटात गेले तरी काहीही बिघडत नाही.
मुग्धा ताई खूप छान माहिती आहे. वाचतानाच जीव तृप्त होतो आहे. सुकट, मासे आणि एकूणच मांसाहार या प्रांतात मी नवशिकीच आहे. आई च्या माघारी हालच आहेत माझे. तुमच्या या ब्लॉग मधून फायदा होणार हे नक्की.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete