सुका जवळा-
बारीक जवळा (किंवा काहीजण कोलीमही म्हणतात).
पांढरा किंचित गुलाबी छटेचा ओला जवळा मिळतो तेव्हा ढिगाने बाजारात येतो. ओला जवळा
बाजारात खूप काही विकला जात नाही, कारण तो तसा थोडाच पुरतो आणि शिवाय त्याला गरीब
लोकांचे खाणे असल्याचा समज उगीच चिकटलेला आहे. आमचा एक कोळी मित्र अनेकदा घरी मासे
आणून द्यायचा त्यात मोठे मासेच जास्त असत. एक दिवस सहज बोलत बसलो असताना त्याला
सांगितलं की आम्हाला सुरमई-पापलेट आवडतं पण त्यापेक्षाही जास्त प्यार आहेत, जवळा,
मोतकं, मांदेलीसारखे बारीक मासळीचे प्रकार. तो आ वासून पाहातच राहिला. म्हणाला-
ओः. मला वाटलं तुम्ही ही गरीबाची मासळी खात नसाल. त्याला सांगितलेलं- मासळीचे दोनच
प्रकार- एक चांगली ताजी आणि दुसरी शिळी उतरलेली. गरीबांची मासळी आणि श्रीमंताची
मासळी हे परवडण्यावर झालं. म्हणून काही कुठली ताजी मासळी वाईट ठरत नाही.
तर हा जवळा असा भरपूर येतो तेव्हा कोळीवाड्यात
लगबग उडते तो जमिनीवर पसरून वाळत टाकण्याची. एकाच कडक, कोरड्या उन्हात वाळलेला खरा
खडखडीत जवळा अगदी ओल्या जवळ्यासारखाच गुलबट पांढरा रहातो. आणि पाण्यात जरा वेळ
भिजत टाकला तर ओल्या जवळ्यासारखाच दिसतो. दोन उन्हं लागली की त्याचा रंग किंचित
बदामी होतो. आणि मग डबाबंद करून ठेवला तरीही त्याचा रंग हळुहळू बदलत पिवळट होऊ
लागतो. चकाकत्या रुपाचा, भाजकट वासाचा, पांढरा गुलाबी किंवा बदामीपिवळट सुका जवळा
बेगमीसाठी भरून घ्यावा.
आता आपण सुरू करू या सुकटसिध्दीकला.
भाजलेल्या सुकटीचे वरदान.
चिकटलेल्या वाळूबद्दल आधी सावधान केलंच आहे, पण
तरीही पाण्यात न घालता तसाच भाजलेला जवळा म्हणजे आहाहा चव... भरपूर पाऊस पडत
असावा, किंवा धुकेशीर थंडी पडलेली असावी. अशा वेळी तांदळाची, नाचणीची किंवा
जोंधळ्याची किंवा मिसळणीची किंवा बाजरीचीही गरमागरम भाकरी आणि संगे भाजलेली सुकट-
बारीक सुका जवळा अशी न्याहारी करायचा घाट घालावा.
अशी कोरडी सुकट भाजायची असेल तेव्हा ती आधी
चांगली निवडून आणि मग बारीक जाळीच्या चाळणीने चांगली चाळून घ्यावी. बोटाच्या
टोकांनी वरखाली हलवून घेत चारपाचवेळा चाळावी. वाळू पडून जाते. मग ती तव्यावर
चांगली हलवत राहून भाजून घ्यावी. अजिबात जळू न देता, तिचा रंग छानसा पिंगट-सोनेरी
झाला पाहिजे. तव्यावरून ती लागलीच खाली दुसऱ्या भांड्यात काढावी. ज्यांची पोटं
नाजूक असतील त्यांनी भाजल्यानंतर पुन्हा एकदा बारीक चाळणीने चाळून घ्यावे. आता या
भाजलेल्या सुकटीसोबत बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ, आमचूर भुकटी, आवडत असेल
तर आणि मिळाली तर लसणाची पावडरही घ्यावी. एक वाडगा भाजलेली सुकट असेल तर एक वाडगा
चिरलेला कांदा, चमचाभर मीठ, सोसेल तेवढं तिखट- दोन चमचे छान झणका आणतील- दोन
दणक्या चिमटी आमचूर आणि लसूण पावडर. दोन चमचे तेल असं सगळं ताटात भाकरी पडल्यावर
एकत्र करायचं थोडं बोटांनी कुस्करून एकवटायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर, ठेचून
तेलात तळलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची हे हवे तसे आलटूनपालटून कधीमधी
मिसळावेत. ओला खवलेला नारळ मिसळणेही पर्यायीच. फार कमी वेळात तयार होणारी, पचायला
हलकी अशी ही पहिली सुकटसिध्दी.
सुकटकांदा ओलसरसा-
चपाती भाकरीबरोबर भाजीसारखी खाता येणारी वस्तू
म्हणजे हा ओलसर सुकटकांदा. वाडगाभर सुकट चांगली निवडून पाण्यात भिजत टाकावी.
हाताने थोडी चोळून घ्यावी. आणि मग ती तशीच तीनचार मिनिटे राहू द्यावी. तोवर दोन
वाडगे बारीक चिरलेला कांदा तयार ठेवावा. दहा-बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून
घ्याव्यात. वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. हिरवी मिरची की लाल तिखट आपण
पर्याय निवडायचा आहे. हिरवी मिरची सोसत असेल तर पाचसहा लांबड्या मिरच्या भरडून
घ्याव्यात. लाल तिखट हवं असेल तर दोन चमचे. पाच कोकमं हाताशी ठेवावीत. एक चमचा
मीठ. एक चमचा हळद.
ही तयारी हाताशी ठेवल्यावर कढई- खोलगट तवा तापत
ठेवावा. लोखंडी असेल तर बहारच. आणि तो चांगला तापेपर्यंत सुकट घोळून पाण्यातून
बाहेर काढावी. वाळू खाली बसलेली असते. पुन्हा एकदा ती वेगळ्या पाण्यातून चांगली
धुवावी आणि चाळणीवर टाकून घट्ट पिळावी.
सुकटकांदा किंवा नंतर येणारे सारेच प्रकार करताना
फोडणी करणे आणि त्यात सुकी मासळी परतणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे.
तापलेल्या कढईत-तव्यात अर्धी वाटी तेल टाकावे.
तापल्यावर त्यात दोन चिमटी हिंग तडतडू द्यावा. त्यावर ठेचलेला लसूण सोनेरी होऊ
द्यावा. जाडसर भरडलेली, किंवा मोठे तुकडे ठेवून ठेचलेली हिरवी मिरची टाकावी. (लाल
तिखट वापरायचे असेल तर ते आधी टाकू नये.) मग कांदा टाकावा. हा कांदा चांगला
पारदर्शक गुलाबी बदामी होईस्तोवर परतावा. मग त्यावर एक चमचा हळद, (लाल तिखटाची
असेल तर आता लाल तिखट टाकावे). मीठ घालावे. कांद्यात मिसळून घेतल्यावर त्यावर सुकट
टाकावी. पाच कोकमं टाकावी. आता हे सारे चांगले परतत रहायचे. खकाणा उडालाच पाहिजे
थोडासा. कुणीतरी यावं आणि विचारावं- अरे आज सुकट करतेस/करतोस जेवणात! मग चूल बंद करताकरता त्यात कोथिंबीर टाकून हलवून
घ्यावे.
हा ओलसर सुकटकांदा पाणी न घालताच ओलसर रहातो.
यातच पाणी घालून आलं-लसणाचं वाटण चमचाभर घालून
थोडावेळ उकळू द्यावं. दाटसर पाणी सुटलेला हा प्रकार चपाती आणि भाताशीही खाता येतो.
हा बारीक सुकट वेगवेगळ्या भाज्यांबरोबरही वापरून
भाजीची शान वाढवता येते. (शाकाहारी चवच मान्य असलेले नेमकं उलट बोलतील).
वांगी, घोसाळी, कच्चा फणस, पडवळ, गवार, केळफूल,
कोबी, कॉलीफ्लॉवर, बटाटा, मेथी या भाज्यांमधे कांद्यावर शिजवून घेतलेली किंवा
तेलात परतलेली बारीक सुकट घालता येते. सोडे, बोंबीलही टाकता येतात.
सरसरून मोड आलेल्या मेथीत बारीक सुकट घालून फारच
छान चवदार भाजी होते. या सर्वांच्या सिध्दी आता इथे देतेय टप्प्याटप्प्याने.
हा फोटो ब्लॉगचे वाचक शंकर माने (एंजिनीअर) यांनी पाठवला. ब्लॉग वाचून बऱ्याच वर्षांनंतर सुकटीची आठवण झाली म्हणाले. मग बाजारात जाऊन सुकट आणली नि स्वतः केली. ज्वारीच्या भाकरी सोबत. :)
व्वा छान, ताई हे जवळा म्हणजे बारीक झिंगे का?
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteकाय खतरनाक ब्लॉग आहे! फार म्हणजे फारच जोरात धन्यवाद. हे लिहिलं जायला हवंच होतं. :)
ReplyDeleteआभारीच.
Deleteपहिलीच सुकटगिरी जोरात !
ReplyDeleteहे लसूण पावडर बाजारात मिळत कां ?
पहिलीच सुकटगिरी जोरात !
ReplyDeleteहे लसूण पावडर बाजारात मिळत कां ?
हो.गार्लिक मैजिक टेस्ट एनहान्सर नावाने.
DeleteThis comment has been removed by the author.
Delete