Sunday, January 24, 2016

सोडेमसाल्याची भरली वांगी

महाराष्ट्रात कुठेही गेलं तर कुठल्या ना कुठल्या पध्दतीची भरली वांगी मिळतातच. थोडाथोडा मसाल्यांचा, तिखटाचा, घट्टपातळपणाचा फरक असतो, त्यामध्ये मिसळलेली व्यंजनं वेगवेगळी असतात. कुणी शेंगदाणे घालतं, कुणी हरभरे, कुणी पावटे घालतं. कुणी काळेतीळ किंवा तिळकूट घालतात. पण मांसाहारी महाराष्ट्रात एक खास पध्दत आहे- मसाल्यात तळलेले सोडे कुटून मिसळण्याची. या सोड्यांची वांग्यात अलगद मिसळून एकजीव होणारी चव म्हणजे लाजबाब.
तर आता या फर्मास भरल्या वांग्यांची कृती.
कुठल्याही भरल्या वांग्यांसाठी घेतात तसलीच लहानसर गोल वांगी घ्यावीत. पाव किलो वांगी घेतली तर पाच-सहा वांगी बसली पाहिजेत. थोडी मोठीच मिळाली तरी फारशी हरकत नाही म्हणा.
वांग्यांची तयारी-
काटे वांगी असली तर देठावरचे काटे काढून देठ अर्धा ठेवावा. हिरव्या पेल्याची टोकं अलगद कापून टाकावीत. आणि मग वरून दोन चिरा देठापर्यंत पोहोचतील अशा क्रॉस देऊन मिठाच्या पाण्यात टाकून ठेवावा.
वांग्यात भरण्याचा मसाला-
अर्धा किलो वांग्यांसाठी एक छोटी वाटीभरून सोडे घ्यावेत. वांग्यांच्या प्रमाणात सोड्यांचे प्रमाण कमीजास्त करावे. सोडे चांगले भिजवावे. त्याला चिकटलेली वाळू पाण्यात जाऊ द्यावी. मग ते घोळून घ्यावे. पिळून घेऊन चमचाभर तेलावर चांगले परतून घ्यावेत. दोन कांदे चिरून चांगले फिक्या तपकिरी रंगावर तळसून घ्यावेत. पाववाटी खोबरं भाजून घ्यावं. त्यात पंधरावीस पाकळ्या लसूण, लाल तिखट दोन ते तीन चमचे, दीड चमचा किंवा चवीनुसार मीठ, बडीशेप, धणे, आणि तळलेले सोडे घालून हे सारं फार पाणी न घालता घट्टच वाटण वाटावे. ओली हळद असेल तर एक बोट तीही घालावी. आता या वाटणाच्या गोळ्यात अगदी बारीक चिरलेला अर्धा कांदा आणि भरपूर कोथिंबीर चिरून घेऊन मिसळावी. अर्ध्या लिंबाचा रस घालावा. हे सारे छान हाताने मिसळून घेऊन थोडी चव चाखून बघावी. चव मनास आली तर मग चिरून ठेवलेल्या वांग्यांच्या पोटांत घट्ट भरावे. थोडा मसाला उरायला हवा.
आता शिजण्यासाठी घट्ट झाकणाचे, जाड बुडाचे भांडे किंवा सरळ प्रेशरकुकर, पॅन घ्यावे.
उदारहस्ते गोडेतेल, तिळतेल, ऑलिवतेल, सूर्यफुलाचे तेल यांपैकी काहीही एक तेल तापलेल्या भांड्यात घालावे. अर्धा किलो वांग्यांसाठी पाऊण वाटी तेल पुरे.
तेल तापले की भरपूर हिंग पावडर घालावी. पाचसहा लसूण ठेचून घालावेत. आणि अगदी थोडासा कांदा घालावा. त्यावर पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा तिखट, एक चमचा बडीशेप पूड घालून थोडेसेच परतावे. यावर उरलेला वाटणाचा गोळा टाकून हलकेच मिसळावे. आणि मग त्यात भरून ठेवलेली वांगी एकेक करून रचावीत. चमच्याने हलकेच दोन बाजूंनी थोडी परतून घ्यावीत. मिक्सर विसळण्यासाठी घातलेले साधारण दोन वाट्या पाणी वर घालावे. दोन लहान चमचे कोकम आगळ किंवा अर्ध्या लिंबाचा रस घालावा. हलकेच हलवावे आणि झाकण लावावे. प्रेशर लावले तर जास्तीत जास्त तीन शिट्या न लावले तर दहा मिनिटे शिजू द्यावे. मुरू द्यावे. सकाळी केलेली वांगी रात्रीच्या जेवणात घ्यावीत किंवा रात्री करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी खावीत. त्याच दिवशी खाल्ली तरीही चांगलीच लागतात- पण जरा मुरली की बहार!
सोडे नसण्याची आफत असेल तर सुका जवळा छान परतून घेतला तरीही काम भागतं. पण सोडे ते सोडेच.

सजावटीसाठी थोडे कुरकुरीत तळलेले सोडे आणि ताजी चिरलेली कोथिंबीर वर पसरावी. तांदळाची उकडीची भाकरी किंवा साधी भाकरी किंवा ओतभाकरी कशाहीसोबत ही भरली वांगी छानच लागतात. आणि मसाला पुसून भात खायलाही मस्स्तच.

3 comments: