थंडीच्या दिवसांत फूडफेस्टिवल्स
चालू होतात. या फूड फेस्टिवलमधला लोकांचा एक लाडका पदार्थ म्हणजे सोड्याची खिचडी.
चांद्रसेनीय कायस्थांच्या स्वयंपाकघरातून मिरवणारी ही चीज. पण देशावरही सोडेभात
छानच केला जातो. भाताच्या संगतीला सोडे आणणाऱ्या बेतहाशा रुचकर पदार्थाच्या
दरवळणाऱ्या सुवासाने अर्धा जीव गेलेला माणूसही आशेने परतेल.
उत्तम प्रतीचे सोडे आणि कोणताही
सुगंधी, चिकट न होणारा तांदूळ अशी दोन मुख्य द्रव्ये यासाठी आवश्यकच. बासमती किंवा
तुकडा-पौना बासमती ही माझी वैयक्तिक पसंती.
दोन वाट्या तांदळाच्या
सोडेखिचडीसाठी प्रमाण देते आहे.
दोन वाट्या तांदूळ धुवून उपसून
ठेवावा. तो तसाच वीस ते तीस मिनिटं राहू द्यावा.
एक मोठासा कांदा जाड उभा चिरून
काळपट रंगावर परतून, पाव वाटी सुकं खोबरं किसून भाजून त्यात थोडी कोथिंबीर आणि सहा
लसणाच्या पाकळ्या घालून बारीक गुळगुळीत वाटून घ्यावे.
पाऊण वाटी सोडे भिजत घालावेत.
प्रत्येक सोड्याचा अर्धा तुकडा केला तरी चालेल किंवा आवडत असेल तर अख्खाच ठेवला
तरीही चालेल. सोड्याला वाळू चिकटलेली असल्यास ती खाली बसेल. मग वरच्यावर सोडे
काढून नीट चोळून धुवावेत आणि पुन्हा पाण्यातून काढून पिळून ठेवावेत.
एक मध्यम कांदा अगदी बारीक चिरून
घ्यावा. सातआठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात. साताठ मिरे, दोन लवंगा, दोनतीन
दालचिनीचे तुकडे भरड ठेचून घ्यावेत. ओले काजू मिळत असले तर ते वाटीभर सोलून घ्यावेत,
नाहीतर वाटीभर साधे काजूच जरावेळ भिजत घालावेत. आले-लसणाचे वाटण दोन चमचे. हिंग. हळद
एक चमचा, लाल तिखट २ ते ३ चमचे (आवडीनुसार- क्षमतेनुसार), दोन चमचे भरून मीठ,
बडीशेप पूड एक चमचा, धणेपूड एक चमचा. कोकम आगळ तीन छोटे चमचे किंवा एक लिंबाचा रस.
दीड वाटी गोडे तेल किंवा तिळ तेल किंवा ऑलिव तेल किंवा सूर्यफूल तेल, आणि अर्धी
वाटी तूप असे साहित्य हाताशी ठेवावे.
कुकर किंवा जाड बुडाचं, घट्ट
झाकणाचं पातेलं तापत ठेवावं. गॅस मोठ्ठा ठेवावा.
तेल तापत आलं की हिंग भरभुरावा.
चर्र वाजला की लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकाव्यात. त्या पिवळट झाल्या की त्यात
बारीक चिरलेला कांदा घालावा. तो गुलाबी झाला की पिळून घेतलेले सोडे घालून झटक्याने
परतावे. त्यावर हळद, तिखट, आले-लसूण वाटण, बडीशेप पूड, धणेपूड, मीठ घालून जोरदार
परतवावे. त्यातच लिंबाचा रस किंवा कोकम आगळ घालावे. मग कांदा खोबऱ्याचे वाटण घालावे.
हे सारे छान परतत रहावे. तेल सुटू लागले पाहिजे, आणि रंग खतरनाक लालतपकिरी दिसला
पाहिजे. मग काजू घालून थोडेसेच परतावे. आता त्यात धुतलेले तांदूळ घालावेत. जितके
तांदूळ असतील त्याच्या दुप्पट घालावे. तांदूळ फार जुना असल्यास आणखी अर्धी वाटी
पाणी वाढवावे. आता एक उकळी फुटली की मग गॅस कमी करायचा आहे. झाकण बसवावे. प्रेशर
कुकर लावला असल्यास शिट्टी व्हायच्या सुमारासच गॅस बंद करावा. निदान एक शिटी
झाल्यावर तर नक्कीच लगेच बंद करावा. यात फार काही शिजायला कठीण असे नाहीच.
त्यामुळे गिजगा भात व्हायला नको. वाफ अर्थातच चांगली अर्धा तास जिरूमुरू द्यावी. भांडे
उघडल्यावर त्यात अर्धी वाटी तूप ओतून हलकेच काट्याने हलवून घ्यावे. तुपाचा स्वाद
सगळीकडे लागायला हवा. आणि मग पुन्हा झाकण लावावे.
सोड्याच्या खिचडीबरोबर नारळाचे
नुसते मीठ घातलेले दूध किंवा मग गुलाबी सोलकढी हीच उत्तम सोबत.
कोथींबीर चिरून सजवणे वगैरे चालू
द्यात. चवीत काही फरक पडत नाही. रसना तृप्तच होते.
या खिचडीचा देशावरचा झणझणीत भाऊ
असलेला सोडेभात. यातही कांदा खोबऱ्याचे वाटण आहेच. पण गरम मसाला युक्त काळे तिखट,
काळी मिरी पूड असे यात भरपूर वापरले जाते. कच्च्या कांद्याचा वापर नाहीच. तेलाचा
वापर अधिक सढळ हाताने. हिंग, लसूण वगैरे वापर वरच्यासारखाच. तांदूळही बासमतीच हवा
असं नाही. कोणताही जरा बारीक तांदूळ चालतो.
सोड्याच्या किंवा कोलंबीच्या खिचडीच्या रेसिपीत मी एक स्वतःचा बदल कधीतरी करते. अगदी शेवटी दोन घसघशीत चिमटी केशर पाण्यात
खलून, तुपाच्या बरोबर मिसळते. पाएला नावाच्या स्पॅनिश कोलंबीभाताच्या भल्या मोठ्या
पातेल्यात ते मूठभर स्पॅनिश केसर उधळतात हे पाहिलंय. त्यावरून प्रेरणा
घेऊन आपण आपल्या दोन केशरचिमटी टाकून पाहू म्हटलं. तर तो बेहतरीन सुगंध भावलाच.
ओले काजू, कळीदार सोडे आणि केशरगंध...
खाते रहो. अजून दोनतीन पोटं असती तर बरं झालं असतं असं वाटायला लावणारी सोड्याची
खिचडी.
तोंडाला मस्त पाणी सुटलंय..
ReplyDeleteतोंडाला मस्त पाणी सुटलंय..
ReplyDeleteभन्नाट रेसिपी आहे !
ReplyDeleteभन्नाट रेसिपी आहे !
ReplyDelete