बाप रे... त्या दिवशी मला उशीर होणार होता म्हणून
आमच्या रंजनाबाईंना सांगितलं- करून टाक मासू सुकट. गेले आणि भुकेलेली जेवायला
बसले. चपातीशी खाल्ली. आणि रात्रीत पोट बिघडलं. जुलाब सुरू झाले.
मासू किंवा दांडी सुकट शिजवतानाची योग्य पध्दत जरा
वेगळी आहे. मासू सुकट हे अगदी छोटेछोटे वाळवलेले मासे असतात. त्यावर अगदी सूक्ष्म असे खवले
असतात. त्यामुळे मासू सुकट करण्यापूर्वी कोरडीच बराच वेळ भाजून घ्यायची. आणि मग
चाळून पाण्यात टाकायची. हाताने चोळवटून धुवायची. असे केल्यानंतरच त्यातले पोटाला
बाधणारे खवले निघून जातात. मग ती पाण्यातून काढून पिळून ठेवावी. मग कांदा-लसूण
टाकून सुका जवळा किंवा आंबाडी ज्या पध्दतीने केली त्याच पध्दतीने करावी. थोडं
तिखटही कमीच घालावं. कारण मासुसकट अतिशय पित्तकर असते. त्यात कोकम भरपूर हवंच. आणि
तिखट बेताने.
हीच मासू सुकट पुन्हा नुसती भाजून, हलकेच
कुस्करून, भुस्कट फुंकून टाकायचं. त्यात बारीक चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, बारीक
चिरलेलं आलं, मिरची, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ घालून सगळं एकत्र कालवायचं. अशी
कोशिंबीर करता येते.
तामिळ पध्दतीचं एक कालवण याच मासूसुकटीचं केलं
जातं. तिथे मासुसुकटीला कारुवडू म्हणतात. लिंबाएवढा चिंचेचा कोळ काढून त्यात दोन
पेले पाणी घालायचं. त्यात दोन बारीक चिरलेले कांदे, एक टोमॅटो बारीक चिरून दोन
मिरच्यांचे तुकडे चारपाच लसूण, एक चमचा लाल तिखट, एक चमचा जिरे पूड, हळद, मीठ आणि
एक डावभर तीळ तेल असं सगळं एकत्र करून उकळत ठेवायचं. ते चांगलं उकळलं की त्यात
स्वच्छ धुतलेली बचकाभर मासू सुकट टाकून पुन्हा पाच मिनिटं उकळत ठेवायचं. झालं
कालवण. जरा अजबच वाटतं फोडणीची सवय असलेल्या आपल्याला. ठीकठाक लागत असावं.
No comments:
Post a Comment